दिल्ली, ८ : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाचा, आसिफ कुरेशी याचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री दिल्लीतील निजामुद्दीन भागातील जांगपूरा भोगल लेन येथे घडली. पार्किंगच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता, आसिफ कुरेशी याच्या घरासमोर एका व्यक्तीने स्कूटर पार्क केली होती. आसिफने स्कूटर हलविण्याची विनंती केली असता, संबंधित व्यक्तीशी बाचाबाची झाली. वाद चिघळत गेला आणि काही अज्ञातांनी आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आसिफचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी निजामुद्दीन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत २ आरोपींना अटक केली आहे. तसेच, हत्येतील शस्त्र जप्त करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तणावाचे वातावरण असून, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.








