नागपूर, ता. १६ : नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी मंगळवारी (ता.१५) भांडेवाडी येथील विविध प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. यावेळी निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याचे निर्देश पंत यांनी दिले.
याप्रसंगी मनपाचे उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, सल्लागार जगताप यांच्यासह सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी सर्वप्रथम भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भांडेवाडी डम्पिंग परिसरातील वजन काटा च्या कामांची पाहणी केली. व नव्या वजन काटावरून काम सुरू करण्याचे निर्देश दिले. नंतर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीच्या प्रकल्पाची पाहणी करित संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांना ८०० मेट्रीक टन कचरा संकलित होत असल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी ३० एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या नव्या प्लांटच्या कामाची पाहणी केली. तसेच बायोमेडिकल वेस्ट या प्रक्रियेची गती वाढविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय बांधकाम आणि पाडकाम ((Construction and Demolition) कचरावर कार्य करणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली. याशिवाय जनावरांसाठीचा दहन घाटाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी संबधित विभागाला निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.



