– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय पाणीटंचाई समितीची बैठक; जलस्रोतांच्या नियोजनासह अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना
कामठी, प्रतिनिधी :- आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कामठी तालुक्यातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम व सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कामठी पंचायत समिती येथे तालुकास्तरीय पाणीटंचाई समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, आगामी काळातील पाण्याची गरज, उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन आणि संभाव्य टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत तालुक्यातील उपलब्ध जलस्रोतांची स्थिती आणि गावनिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी पूर्वनियोजन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

संभाव्य टंचाईग्रस्त गावांची परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि आवश्यक पर्यायी व्यवस्थेबाबतही बैठकीत चर्चा झाली. पाण्याची उपलब्धता आणि वाढती गरज यांचा ताळमेळ साधून प्रभावी नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार गणेश जगदाळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पियुष डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष उमेश रडके, तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगवणे, भाजप कोराडी मंडळ अध्यक्ष ब्रम्हा काळे, माजी सभापती रामकृष्ण वंजारी, विनोद पाटील, भास्कर भणारे, बंडू कापसे यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








