– अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना मार्गदर्शन; १०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
कामठी :- कार्यस्थळी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंचायत समिती कामठी, येथे शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी POSH कायद्याविषयी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात एकूण १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला ग्रामीण कामठीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी अलका खंते, शिक्षणाधिकारी कामठी तसेच पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान नागपूर येथील डॉ. कनक वाधवानी यांनी महिलांचा कार्यस्थळी होणारा लैंगिक छळ प्रतिबंधित करणे, त्यास प्रतिबंध घालणे व तक्रारींचे निवारण करणे या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या POSH कायद्याच्या विविध तरतुदींची सविस्तर माहिती दिली. तसेच कायद्याची अंमलबजावणी, अंतर्गत तक्रार समितीची जबाबदारी आणि कार्यस्थळी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला.
नागपूर येथील सी. एस. रश्मी सागर मिटकरी यांनी POSH कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या तक्रारींची हाताळणी कशी करावी, तक्रारींची चौकशी कोणत्या पद्धतीने करावी, त्यासाठी अनुसरावयाची प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तक्रार निवारण प्रक्रियेत गोपनीयता, निष्पक्षता आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालणं , विधी सल्लागार धानकुटे मॅडम यांनी कार्यक्रमाचे केले. यासोबतच त्यांनी केंद्र शासनाच्या SHE-Box पोर्टलची कार्यपद्धती, त्याद्वारे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच विविध आस्थापनांच्या नोंदणीसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महिलांना कार्यस्थळी सन्मानपूर्वक आणि निर्भय वातावरण मिळणे हा केवळ कायदेशीर अधिकार नसून प्रत्येक आस्थापनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या दृष्टीने अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान असणे, तक्रारींची योग्य पद्धतीने हाताळणी करणे आणि प्रभावी निवारण यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या सर्व बाबींची सविस्तर माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांतील एकूण १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.








