– ९.७३ किलो प्लास्टिकसह प्लास्टिक पतंग जप्त
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून आज शहरात नायलॉन मांझा व प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एकूण ६,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
३१ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि साठा केल्याप्रकरणी एका मोठ्या दुकानदारावर ५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, दुकानाबाहेर उघड्यावर कचरा टाकून अस्वच्छता पसरवणाऱ्या ३ दुकानदारांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण १,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

नायलॉन मांझा विक्रीवर असलेल्या बंदीच्या अनुषंगाने प्रशासकीय पथकाने विविध दुकानांची झडती घेतली. यावेळी दोन दुकानांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचे पतंग विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. पथकाने अंदाजे १ किलो प्लास्टिक पतंग जप्त केले आहेत. मात्र, या तपासणीत नायलॉन मांझा कोठेही मिळून आला नाही, ही एक दिलासादायक बाब ठरली.
प्रशासनाने राबवलेल्या या विशेष मोहिमेत दिवसभरात एकूण ९.७३ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. “प्लास्टिक आणि नायलॉन मांझा पर्यावरणासाठी आणि मानवी जीवनासाठी घातक आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील,” असा इशारा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या कारवाईमुळे शहरात प्लास्टिक आणि नायलॉन मांझा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.








