Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

– भरलेले अर्ज 21 मे पर्यंत स्वीकारले जाणार

 हंसराज, भंडारा :- सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमाती (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 20 एप्रिल 2026 पासून प्रवेश अर्ज निःशुल्क वितरित करण्यात येत असून, पूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 21 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक असून, त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी बीपीएल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय शासनाच्या नियमानुसार असावे. अर्जासोबत जन्मतारीख दाखला, आधार कार्ड, पालकांचे संमतीपत्र, तसेच विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे आवश्यक आहे. पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत, अशी अटही घालण्यात आली आहे.

विशेष प्रवर्गातील (आदिम जमाती, अपंग, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता) पालकांनी संबंधित पुरावे जोडणे आवश्यक राहील. प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच शाळेत शिक्षण घेणे बंधनकारक असून, कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलण्यास परवानगी दिली जाणार नाही.

मंजूर जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास विद्यार्थ्यांची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. अंतिम निवडीचा अधिकार प्रकल्पस्तरीय निवड समितीकडे राहील.

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला, त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे निःशुल्क उपलब्ध आहेत. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.