spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा आणि शिस्त अंगीकारा – विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचे आवाहन

 

नागपूर, दि. २६ – “देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि राष्ट्रसेवेसाठी आवश्यक असलेले तुमचे मूलभूत प्रशिक्षण आता पूर्ण झाले आहे. यापुढे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा आणि शिस्त अंगीकारून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी समर्पित व्हा,” असे प्रेरणादायी आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज केले.

राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. ४, हिंगणा रोड, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील नव्याने रुजू झालेल्या नवप्रविष्ठ पोलिस शिपायांच्या मूलभूत प्रशिक्षण सत्र क्र. ६८-ब चा दीक्षांत समारंभ आज दिमाखात संपन्न झाला. हे कठोर प्रशिक्षण ०९ डिसेंबर २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घेण्यात आले होते. समारंभाचे आयोजन कवायत मैदान क्रमांक-१, गट क्र. ४, नागपूर येथे करण्यात आले होते.

या प्रसंगी निसार तांबोळी म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात आरोग्याचे महत्त्व जितके आहे, तितकेच मानसिक कणखरपणाही आवश्यक आहे. यासोबतच प्रत्येकाने शिस्तीचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

समारंभाची सुरुवात शिवगर्जनेने झाली. या कार्यक्रमासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या आगमनानंतर राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. ४ चे समादेशक बच्चन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक बच्चन सिंह यांनी सादर केले. त्यांनी सांगितले की, एकूण २७३ नवप्रविष्ठ पोलिस शिपायांना ९ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. यामागचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि सर्वोच्च सशस्त्र पोलिस दल तयार करणे. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेवरील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण त्यांना परिपूर्ण बनविण्यात मदत करणार आहे.

दीक्षांत परेडचे नेतृत्व परेड कमांडर अक्षय परशुराम लोणगाडगे यांनी केले, तर सेंकंड-इन-कमांडर वैभव विनोद चौधरी होते. संचलनानंतर १० उत्कृष्ट नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या समारंभासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ज्यात प्रमुखतः अनिल कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल, नागपूर; डॉ. हरिओम गांधी, पोलीस उपमहानिरीक्षक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर; मंगेश शिंदे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर; सुशांत सिंग, समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. ९, अमरावती; क्षितीज गुरव, क्षेत्रीय पारपत्र अधिकारी, नागपूर; विनीता व्यास, उपवनसंरक्षक, नागपूर; रीना जनबंधू, प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर; प्रभाकर शिंदे, समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. ६, धुळे यांचा समावेश होता.

याशिवाय प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय, शहीद कुटुंबे, शालेय विद्यार्थी, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम समादेशक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यासाठी डी.बी. ईश्वरकर, पी.बी. भजने, आर.एम. जाधव, डी.जी. शेडमाके, एस.पी. कवडो, बी.आर. आगरकर, आर.एन. मडावी, पोलीस निरीक्षक व्ही.एस. घाईट, आर.एन. गायकर, आर.एस. तायडे, पोलीस उपनिरीक्षक पी.एन. बघेल, रक्षक जमादार तसेच संपूर्ण प्रशिक्षक वर्ग, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. ४, नागपूर यांनी अथक परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.