spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

योगाचा दैनंदिन जीवनात अंगीकार करा – डॉ. छाया सराफ

नागपूर :- योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली आहे. त्यामुळे प्रत्येकाने योगाचा दैनंदिन जीवनात अंगीकार करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. छाया अनिल सराफ यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आनंदवन योग साधना केंद्र, नंदनवन येथे १९ ते २१ जून दरम्यान आयोजित तीन दिवसीय योग शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मोठ्या संख्येने योगसाधक उपस्थित होते. ‘योग आणि विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. सराफ यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय महत्त्व सोप्या भाषेत उलगडून सांगितले. आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता तणाव, चिंता आणि विविध जीवनशैलीजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन शांत राहते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते, असेही त्यांनी सांगितले. शिबिराच्या पहिल्या दिवशी (१९ जून) ओशो विचारधारेचे अभ्यासक महेंद्र नागपाल यांनी सक्रिय ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. शरीरातील सुप्त ऊर्जा जागृत करून ध्यानाच्या माध्यमातून आत्मशांती प्राप्त करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी (२० जून) आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. भरत गुप्ता यांनी शरीरातील सात चक्रांवर आधारित विशेष ध्यानसत्र घेतले. विविध चक्रांचे महत्त्व, त्यांचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम तसेच प्रत्यक्ष साधना याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. या सत्राला योगसाधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आनंदवन योग साधना केंद्राचे प्रमुख प्रविणचंद्र शाह यांनी शिबिरा दरम्यान सातत्याने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नगरसेवक निलेश गायधने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी योगाचे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करत योगाचा अधिकाधिक प्रसार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन योग शिक्षक किशोर खडगी यांनी केले, तर अतुल शृंगारपवार यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश समर्थ, दिनेश राठी, माया बनसोड, माला आडे, वंदना बिडवई, अनिता धोपाडे, आनंद शर्मा, रामचंद्र जगताप, मंजुषा झुरमुरे, रिटा समर्थ, ठाकरे मॅडम तसेच सर्व योगसाधकांनी विशेष सहकार्य केले. तीन दिवसीय शिबिरामुळे सहभागी साधकांना योग, ध्यान आणि निरोगी जीवनशैलीबाबत नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशी माहिती अतुल शृंगारपवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Popular Articles