नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी ॲड. रमण सेनाड यांचा दावा

0
4

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी पत्र सादर

नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष ॲड. रमण सेनाड यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली भूमिका मांडली आहे. याच अनुषंगाने त्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारी संदर्भात आपली मागणी मांडली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी आपला दावा मांडणारे पत्र त्यांनी सादर केले. ॲड. रमण सेनाड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिशू गणापासून संघकार्याशी जोडलेले असून, ते मिसाबंदी परिवारातील सदस्य आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष तसेच लोकजागृती मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक, राष्ट्रीय व नागरी प्रश्नांवर आंदोलने आणि जनजागृतीचे कार्य केले आहे. या आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा कारावासही भोगला आहे. रामजन्मभूमी आंदोलना दरम्यान अलाहाबाद येथील नैनी कारागृहात त्यांनी १५ दिवस कारावास भोगला होता, असे त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. उत्तम वक्ते आणि कुशल संघटक म्हणून परिचित असलेले ॲड. सेनाड हे व्यवसायाने अधिवक्ता आहेत. आपल्या व्यावसायिक कार्यासोबतच विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि वंचित घटकांसाठी ते कार्यरत आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघासाठी भाजपमध्ये इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू असून, ॲड. रमण सेनाड यांनीही आपली उमेदवारी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृतपणे मांडली आहे. भाजपकडून या मतदारसंघासाठी विविध इच्छुकांची नावे चर्चेत असताना, माजी आमदार सुधाकर कोहळे आणि माजी विधान परिषद सदस्य अनिल सोले यांचीही नावे चर्चेत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पक्षाकडून अंतिम उमेदवाराची निवड कोणाची होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकजागृती मोर्चाच्या माध्यमातून ॲड.सेनाड यांनी यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर आंदोलने, निवेदने व जनजागृतीचे उपक्रम राबविले आहेत. या दीर्घ सामाजिक व संघटनात्मक कार्याचा अनुभव आणि पक्षाशी असलेली दीर्घकालीन निष्ठा या पार्श्वभूमीवर त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी आपली उमेदवारी पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे. दीर्घकाळ पक्षाच्या विचारधारे सोबत कार्यरत राहिलेल्या आणि संघटनात्मक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या ॲड.रमण सेनाड यांच्या उमेदवारीच्या मागणीवर पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे नागपूर विभागातील भाजप कार्यकर्ते तसेच पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे.