यवतमाळ :- जिल्ह्यातील विविध भागात रासायनिक खते, किटकनाशके विक्री करताना मनमानी करणे, रा. खते ई-पॉस मशिनद्वारे न करणे, रा. खते असतानाही वितरण न करणे, परवाना अटी व शतींचे पालन न करणाऱ्या कृषि सेवा केंद्र चालकांवर परवाना निलंबन करण्याचे कारवाई करण्यात आलेली आहे
जिल्हा भरारी पथकाद्वारे तसेच कृषि अधिकारी (गुणनियंत्रण) यांनी कृषि सेवा केंद्रांची तपासणी केली असता ई-पॉस मशिनवरील युरीया साठा व कृषि केंद्रामध्ये प्रत्यक्ष आढळून आलेला साठा मध्ये तफावत आढळून आलेल्या ६८ कृषि सेवा संचालक यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र तपासणी अंती आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ यांनी सुनावणी दरम्यान समाधानकारक उत्तरे प्राप्त न झाल्याने तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्यामुळे रा.खतांचे १३ परवाने व किटकनाशक अधिनियम १९६८ चे उल्लंघन केल्यामुळे ४ किटकनाशक असे एकूण १७ परवाने निलंबीत केले व या हंगामात ४ बियाणे परवाने, २ रा.खते परवाने व २ किटकनाशक परवाने असे एकूण ८ परवाने कायम स्वरुपी रद्द करण्यात आलेले आहे. तसेच या खरीप हंगाममध्ये अनधिकृत एचटीबीटी बोगस कापुस बियाणे प्रकरणी जिल्ह्यात ७ ठिकाणी भरारी पथकामार्फत धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये एकूण जप्त कापूस बियाणे साठा १०३८ पॉकीटे असुन त्याचे मुल्य १५.७१/- लक्ष रुपयाचा मुद्देमाल असुन सदर ७ प्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवालाद्वारे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच अनधिकृत रा. खत प्रकरणी २ ठिकाणी भरारी पथकामार्फत धाडी टाकण्यात आल्या. सदर धाड सत्रामध्ये पुसद येथील जप्त रा.खत साठा २११ बॅग असुन त्याचे मुल्य १७.८०/- व वणी येथील धाडसत्रात १७० रा. खताचे बॉटल जप्त केले असून त्याचे मुल्य २.१४/- लक्ष रुपये असा एकूण १९.९४/- लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर २ प्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवालाद्वारे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी करतांना विक्रेत्याकडे ई-पॉस मशीनवरील बिलाचा आग्रह करावा. खरेदी केलेल्या खताची व किटकनाशकाची पक्की पावती घ्यावी. तसेच खरेदी केलेल्या खताचे पोते व बॉटलवरील एम.आर.पी. व विक्रेत्याने दिलेले पक्के बिल तपासुन घ्यावे, यासंबंधी काही तक्रार असल्यास तालुका स्तरावर कृषि अधिकारी (गुणनियंत्रण) तालुका कृषि अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा कृषि विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. अशा प्रकारची बेकायदेशीर व मनमानी विक्री करणाऱ्या सेवा केंद्रांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी स्पष्ट केले आहे.
फाईल फोटो




