हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्याने प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि विकासाचा ध्यास घेतलेला एक ‘शब्द पाळणारा’ खंबीर लोकनेता गमावला आहे, अशा शब्दांत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
अजितदादांच्या कार्यशैलीचा गौरव करताना चरण वाघमारे म्हणाले की, “दादा म्हणजे महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कणा होते. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती सदैव स्मरणात राहील. दिलेला शब्द पाळणे ही त्यांची सर्वात मोठी ओळख होती.”
अजितदादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, संपूर्ण राज्य एका महान नेतृत्वाला मुकले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चरण वाघमारे यांनी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




