कन्हान :- रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत आंबेडकर चौक, कन्हान येथे पार पडणार आहे. शृंगार रसाच्या ख्यातनाम कवयित्री मंजुश्री पुष्प कारेमोरे (टीव्ही फेम) यांच्या संयोजनाखाली आयोजित या संमेलनासाठी देशाच्या विविध भागांतील नामवंत कवींना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रसिद्ध हास्य-व्यंग्य कवी आणि शायर आपल्या रचनांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना हास्य आणि व्यंग्याच्या आनंदधारेत चिंब भिजवणार आहेत.
या कार्यक्रमात नागपूरचे प्रसिद्ध गझलकार शादाब अंजुम, बालाघाटचे हास्य कवी व गीतकार गोविंदा ‘गावंठी’, डोंगरिया (बालाघाट) येथील हास्य कवी लक्ष्मीचंद ठाकरे तसेच टीव्ही फेम हास्य-व्यंग्य कवी सुदर्शन चक्रधर (संपादक) आपल्या रचना सादर करणार आहेत. संमेलनाचे सूत्रसंचालन भोपाळचे प्रबोधनकार तथा हास्य-व्यंग्य कवी शैलेश ‘शैल’ करणार आहेत. रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी नागरिकांनी या अखिल भारतीय हास्य कवी संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.






