नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रम शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला. एम.एससी. प्राणीशास्त्र विद्यार्थ्यांसाठी या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. व्ही. टी. धुर्वे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि तांत्रिक शब्दसंग्रह आयोगाचे सहाय्यक संचालक डॉ. अशोक सेलवटकर, सरस्वती पॅथोलॉजी लॅब्स नागपूरचे संचालक डॉ. विनोद जयस्वाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात १९९१-९३ या शैक्षणिक वर्षातील नामवंत माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. विभाग प्रमुख डॉ. व्ही. टी. धुर्वे यांनी माजी विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला.

माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा शैक्षणिक प्रवास, व्यावसायिक अनुभव आणि करिअर विषयक मार्गदर्शन केले. संशोधनाची आवड, वैज्ञानिक लेखनकौशल्य आणि व्यावसायिक नीतिमत्ता याचे महत्त्व माजी विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तांत्रिक शब्दसंग्रह आयोगाचे सहाय्यक संचालक डॉ. अशोक सेलवटकर यांनी विज्ञान संवाद, तांत्रिक पारिभाषिक विकास आणि सरकारी क्षेत्रातील संधींबाबत माहिती दिली, तर डॉ. विनोद जयस्वाल यांनी क्लिनिकल पॅथोलॉजी, डायग्नोस्टिक्स आणि उद्योजकतेतील त्यांच्या अनुभवांची मांडणी करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या संवाद कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथांमधून शिकण्याची आणि स्वतःच्या करिअरसाठी प्रेरणा घेण्याची मौल्यवान संधी मिळाली. प्रा. प्राची राठोड यांनी उपस्थित वक्ते, संयोजन टीम आणि उत्साही विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.




