महिलांच्या सुरक्षेसाठी धंतोली पोलीस ठाण्यात ‘महिला मदत कक्ष’ कार्यान्वित
नागपूर १९ : महिलांच्या सुरक्षेसाठी एक सकारात्मक आणि जनहितार्थ पाऊल उचलत धंतोली पोलीस ठाण्यात “महिला मदत कक्ष” नुकताच कार्यान्वित करण्यात आला असून, “तुमची सुरक्षा, आमची जबाबदारी” (YOUR SAFETY, OUR PRIORITY) या ब्रीदवाक्याखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे नागपूर शहरातील महिलांना पोलीस ठाण्यात विश्वासाने व धाडसाने मदतीसाठी पुढे येता येईल, असे स्पष्ट संकेत नागपूर पोलिसांनी दिले आहेत. ही स्तुत्य संकल्पना पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या दूरदृष्टीतून साकार झाली असून, त्यांनी नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात असा महिला मदत कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, धंतोली पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या या कक्षात प्रशिक्षित महिला अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून, या महिला कर्मचारी अत्यंत संवेदनशीलतेने महिलांच्या समस्या ऐकतात, कायदेशीर सल्ला देतात आणि त्यांना आवश्यक त्या भावनिक मदतीचा आधारही देतात. हा कक्ष म्हणजे केवळ तक्रार नोंदवण्याचं केंद्र नसून, महिलांसाठी एक विश्वासाचं आणि समुपदेशनाचं ठिकाण ठरत आहे. या कक्षाचे उद्दिष्ट महिलांशी संबंधित तक्रारींवर तत्काळ व गांभीर्याने कारवाई करणे, त्यांना कायदेशीर मार्गदर्शन देणे, लैंगिक अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक हिंसेसारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करणे आणि महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे हे आहे. “संवेदना, सुरक्षा आणि समर्थन” हे या उपक्रमाचे मूलमंत्र असून, यामुळे पोलीस ठाण्यांबाबत महिलांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, तसेच समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरेल. नागपूर शहरात महिला सशक्तीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण वाटचाल ठरली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनात धंतोली पोलीस ठाण्यात हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. नागपूर पोलिसांचा हा पुढाकार केवळ स्तुत्यच नव्हे, तर भविष्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक बळकट आधारस्तंभ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




