spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर पोलिसांची जबरदस्त कामगिरी – दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद, तब्बल २९ गुन्ह्यांचा उलगडा, १३.५ लाखांचा ऐवज हस्तगत!

 

नागपूर १९ : नागपूर शहरातील वाहन चोरींच्या घटनांमुळे त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! गुन्हे शाखा युनिट क्र. ३ ने एक मोठा कारनामा करत वाहन चोरी करणाऱ्या शिताफीर टोळीचा पर्दाफाश केला असून, या टोळीने नागपूर शहर व ग्रामीण भागातील एकूण २९ ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल १३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २७ दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांची चौकस नजर आणि तांत्रिक तपास कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या कारवाईची सुरुवात झाली ती २५ मे २०२५ रोजी. फिर्यादी राजेश सुतार यांनी लकडगंज परिसरातील कच्छी विसा ग्राउंडजवळ आपली हिरो स्प्लेंडर (एम.एच. ४९ वीएफ ०४२३) पार्क करून ठेवली होती. काही वेळातच त्यांचे वाहन चोरीस गेले आणि त्यानंतर पोलिसांकडे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा उकलण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ३ चे पथक सक्रिय झाले. पोनि. अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक माहिती गोळा केली आणि त्यातून मिळालेल्या सुगावांवरून दोन संशयित आरोपी करण प्रकाश जाधव व आकाश उर्फ गोगा वर्मा यांना ताब्यात घेतले.

सुरुवातीला एकाच गुन्ह्याची कबुली देणाऱ्या या दोघांनी पोलिसी खाक्या दाखवताच एकामागून एक अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. नागपूरच्या लकडगंज, तहसील, शांतीनगर, पाचपावली, कोतवाली, वाठोडा, सक्करदरा, सीताबर्डी, गणेशपेठ, यशोधरानगर, कळमणा आणि ग्रामीण भागातील कळमेश्वर व खापरखेडा अशा विविध ठिकाणी त्यांनी वाहनचोरी केल्याचे समोर आले.

या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकत्रित किंमत अंदाजे १३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी यासंबंधी पुढील कारवाईसाठी आरोपींना लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले असून, आणखी काही गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त राहुल माकणीकर आणि सहा. पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अनिल ताकसांडे, पोउपनि. मधुकर काठोके, पोहवा. संतोषसिंह ठाकूर, विजय श्रीवास, भूषण भगत, विनोद गायकवाड, पोअं. जितेश रेड्डी, दिपक दासरवार, दिपक लाखडे, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, तसेच पोहवा. सचिन नवाले, पोहवा. आकाश मेश्राम, पोहवा. निखिल ठाकरे, आणि पोशि. पंकज वानखेडे यांनी संयुक्तरित्या केली..

ही कारवाई म्हणजे पोलिसांची फक्त तत्परता नव्हे, तर नागपूर शहरात कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस दल किती सजग आहे, याचा ठोस पुरावा म्हणता येईल. नागपूरकर नागरिकांसाठी ही कारवाई म्हणजे दिलासा देणारी बाब ठरली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.