किशोर साहू, मौदा :- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोदामेंढी येथे शनिवार ( दि. 24 जानेवारी)ला मुख्याध्यापक सी. एस. शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. गीत, संगीत, नृत्य आणि नाटिकांच्या सादरीकरणाने संपूर्ण शालेय परिसर सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचे दर्शन या निमित्ताने घडले.
कार्यक्रमाचा शुभारंभ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिक्षिका कौशिक आणि मुख्याध्यापक सी. एस. शिवणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिक्षिका कौशिक होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा प कोदामेंढी सरपंच आशिष बावनकुळे , उपसरपंच गोपाल गिरमेकर, माजी सरपंच भगवान बावनकुळे, ग्रामपंचायत सदस्यगण विष्णु बावनकुळे, खुशाल शिवणकर, सदानंद मेश्राम, अनिता हटवार, हेमलता देवतळे, अंजली मोहुर्ले, गणेश मोहुर्ले, सुखदेव काचुरे, कल्याणी हटवार, अर्चना बावनकुळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात दिक्षिका कौशिक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, कला व क्रीडा गुणांसोबत येण्याऱ्या परीक्षेलाही निर्भीडपने सामोरे जा, आणि यशस्वी व्हा. सरपंच आशिष बावनकुळे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या प्रगतीचा गौरव केला, “केवळ अभ्यासात हुशार असणे म्हणजे प्रगती नव्हे, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात”. तसेच गोपाल गिरमेकर व भगवान बावनकुळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भविष्यात शाळेच्या विकासासाठी गाव स्तरावरून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविक भाषणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. छोट्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर लोकनृत्य, विविध भाषिक गाण्यावरील नृत्य, लावणी आणि देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले.
हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाच्या नियोजनात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात मुख्याध्यापक सी. एस. शिवणकर व शाळेचे
शिक्षकवृंद मनोहर अहिर, चंदा जाधव , शिल्पा गिरे, किशोर नागमोते, वैभवी अभ्यंकर,सुरेखा कुसरे,माधुरी किन्नाके,रमा हुमणे,मेघश्याम राठोड (कनिष्ठ सहाय्यक), जयश्री बोकडे ,योगिता भुरे,धनपाल महादुले,स्नेहा हटवार
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक कलाकृतीमागे या शिक्षकांचे अथक परिश्रम आणि मार्गदर्शन दिसून येत होते. कोदामेंढी आणि परिसरातील पालकांनी या स्नेहसंमेलनाला मोठी गर्दी केली होती. आपल्या पाल्यांना रंगमंचावर कला सादर करताना पाहून पालकांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव दिसत होते. शाळेच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता झाल्यानंतर लगेचच शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे (सहभोजन) आयोजन करण्यात आले होते. “एकता आणि प्रेम” हा संदेश देणाऱ्या या स्नेहभोजनात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतरच्या या मेजवानीमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.








