या वर्षासाठी ९ हजार ३०० कोटींचा ऋण आराखडा
बॅंकांनी आर्थिक साक्षरता शिबिर राबविण्याचे निर्देश
यवतमाळ, 08 : जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या विशेष आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते वार्षिक ऋण योजना पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सन २०२५-२६ या वर्षासाठी ९ हजार ३०० कोटीचा ऋण आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक साक्षरता शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
यावेळी भारतीय रिजर्व बॅंकेचे मॅनेजर पियुष अग्रवाल, जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड व बँकाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
जिल्हा अग्रणी बॅंकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता तयार केलेल्या ९ हजार ३०० कोटींच्या ऋण आराखड्यात प्राधान्य क्षेत्रात ६ हजार २०० कोटींचे वाटप प्रस्तावित करण्यात आले आहे. गैर प्राधान्य क्षेत्रासाठी ३ हजार १०० कोटींच्या कर्ज वाटपाचा समावेश आहे. आराखड्याप्रमाणे बॅंकांना वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्याप्रमाणे कर्जवाटपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतभर १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान विशेष आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाद्वारे ग्रामपंचायत निहाय बँक शाखेद्वारा घेण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता शिबिराचे नियोजन करण्यात आलेले असून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक या अभियानात सहभागी आहे. या दरम्यान बॅंकांनी नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक सेवा उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
या शिबिराद्वारा अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, सुकन्या योजना व पीपीएफ खाते याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. खातेदारास सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता नोंदणी करता येणार आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कृषी निविष्ठा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील ८८ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विनामूल्य कृषी निविष्ठा व बियाणे देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात २ कुटुंबांना कृषी निविष्ठा व बियाण्यांची किट वितरीत करण्यात आली.




