नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ या सार्वजनिक बस सेवेने नुकताच आणखी एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. एकाच दिवसात तब्बल १.६० लाखांहून अधिक प्रवाशांनी ‘आपली बस’ सेवेचा लाभ घेतला आहे. हा प्रवाशांनी मनपाच्या परिवहन सेवेवरील वाढता विश्वास दर्शवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत मनपातर्फे १४५ नवीन ई-बस रस्त्यावर धावणार असून, एकूण ४१५ ई – बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आपली बस’ची सेवा सातत्याने प्रगती करत आहे. गेल्या काही वर्षांपासून बस सेवेत केलेल्या सुधारणांमुळे वातानुकूलित बसेसचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
यशाबद्दल बोलताना मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, ’नागपूरच्या प्रवाशांनी आपली बस वर विश्वास टाकला आहे, मनपा प्रवाशांची सोय व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. आता आपण सर्वांनी मिळून एक हरित, स्मार्ट आणि सुलभ भविष्याची निर्मिती करायची आहे. असे म्हणत डॉ. चौधरी यांनी नागपूरकरांचे आभार ही मानले आहे.
सतत वाढणारी प्रवाशांची पसंती
नागपूर बस सेवेच्या प्रगतीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
प्रवासी संख्या: जुलै २०२४ मध्ये ११.०१ लाख प्रवासी होते, ती संख्या जुलै २०२५ मध्ये वाढून १२.८५ लाख झाली आहे. ऑगस्टमध्ये शनिवार आणि रविवारी प्रत्येकी १.५० लाख पेक्षा जास्त नागरिकांनी आपली बसचा वापर केला आहे.
डिजिटल पेमेंट: डिजिटल पेमेंट करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे, १६,१८२ वरून ती ३८,७४८ पर्यंत पोहोचली आहे.
बसची संख्या: ताफ्यात असलेल्या एकूण बसची संख्या ३९५ वरून वाढून ४१६ झाली आहे.
इलेक्ट्रिक बस कडे वाटचाल
पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने इलेक्ट्रिक बसेसच्या संख्येत मोठी वाढ केली आहे.
जुलै २०२४ मध्ये: २५८ डिझेल आणि १६९ इलेक्ट्रिक बसेस होत्या.
जुलै २०२५ मध्ये: २२४ डिझेल बसची संख्या कमी झाली असून इलेक्ट्रिक बसेस मध्ये २४० पर्यंतची वाढ झाली आहे.
नवीन बसेस: खापरखेडा, पारडी आणि बुटीबोरी मार्गांवर २० नवीन इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा झाला आहे. या बसेस मध्ये आता पर्यंत १ लाख २२ हजार ४४७ नागरिकांनी प्रवास केला आहे.
सप्टेंबर महिन्यापर्यंत २७ डिझेल बसेस टप्प्याटप्प्याने सेवेतून काढून टाकल्या जाणार आहेत.पुढच्या काही महिन्यात ३० नवीन ई-बस रस्त्यावर धावणार आहे.
मार्ग पुनर्रचना आणि विस्तार
प्रवाशांच्या सोयीनुसार एकूण ७८ मार्गांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन मार्ग सुरू करून आणि जुन्या मार्गांचा विस्तार करून बस सेवा अधिक व्यापक केली जात आहे.
नवीन मार्ग: हिंगणा – दीक्षाभूमी – सीताबर्डी, प्रजापती मेट्रो – घोरपड, पवनगाव, बुटीबोरी – सिम्बायोसिस कॉलेज यांसारखे नवीन मार्ग सुरू झाले आहेत.
मार्ग विस्तार: एअरपोर्ट – सीताबर्डी, पारडी – हिंगणा ग्रामीण रुग्णालय, पिपळाफाटा – फ्रेंड्स कॉलनी या मार्गांचा विस्तार करण्यात आला आहे.
विद्यार्थी आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ६ विशेष ट्रिप्स सुरू करण्यात आल्या आहेत.
व्यावसायिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी सकाळी व सायंकाळी विशेष फेऱ्या उपलब्ध आहेत.
‘NMC Chalo App’ च्या माध्यमातून पास काढणे आणि प्रवासाची माहिती मिळवणे सोपे झाले आहे.
सक्रिय पासधारकांची संख्या १३,००० वरून २२,००० पर्यंत वाढली आहे, ज्यात १८,००० हून अधिक विद्यार्थी आहेत.
डिजिटल बस सेवेची दिशा
मनपाने ३ मार्गांवर ७० टक्के पेक्षा जास्त प्रवासी डिजिटल पेमेंटचा वापर करत असल्याचे निरीक्षण केले आहे. लवकरच हे मार्ग पूर्णतः डिजिटल म्हणून घोषित करण्याची मनपाची योजना आहे, ज्यामुळे नागपूर सार्वजनिक वाहतुकीमध्ये डिजिटल क्रांतीचे एक नवीन उदाहरण प्रस्थापित करेल.








