– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभातील एका दिवसाच्या वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. पण संजय राऊत, तुमच्यामुळे आणि उद्धव ठाकरेंमुळे हा प्रकल्प अडीच वर्षे उशिरा सुरू झाला. त्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेची नाक घासून माफी मागा, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला.
वास्तविक मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्याने आज कुठेही वाहतूक कोंडी नाही. मुंबईपासून पुण्याला दोन ते सव्वादोन तासात पोहोचता येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार गतिशील आहे तर तुमचे सरकार स्थगिती सरकार होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.मिसिंग लिंक, मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, बीडीडी चाळींचा पुनर्विकास हे सारे देवेंद्रजींनी केले. आम्ही महायुतीची शंभर कामे जनतेला सांगू शकतो. उद्धवजींनी केलेले एक काम संजय राऊत यांनी सांगावे. तुमच्या नावावर नेमके काय तर पत्राचाळ घोटाळा, खिचडी घोटाळा, कोविड घोटाळा. तुमच्या नावावर महाराष्ट्राचा घरबस्या मुख्यमंत्री म्हणून किताब. तुमच्याकडे करण्यासारखे आणि दाखवण्यासारखे काहीच नव्हते. कारण तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसून होतात, असे बन यांनी सुनावले.
युद्धाच्या काळातही महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. संजय राऊत, तुम्हाला प्रिय असलेल्या पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल पाचशे रुपये लिटर आहे. बांगलादेशात काय स्थिती झाली ते पहा. श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांना दोनशे रुपये किलो गहू, तांदूळ झाले ते पहा. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव मर्यादित ठेवण्याचे काम केल्याबद्दल कधीतरी सरकारचे कौतुक करा, असे बन म्हणाले.
पत्रकार परिषदेत अंबानी – अदानींवर टीका करायची आणि त्यांच्या घरी जाऊन मुजरे घालायचे, नाच करायचा ही तुमची सवय झाली आहे, असे सांगत बन पुढे म्हणाले अंबानी अदानी यांच्यावर रोज उठून टीका करताय. संजय राऊत, मुंबईतील कुठलीही जमीन कोणाच्याही घशात घातली जाणार नाही. कारण हे जनतेचे सरकार आहे. तुमच्यासारखे अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवून, त्यांना धमकी देऊन ‘सचिन वाजे काय लादेन आहे का’, असे म्हणणारे आम्ही नाही.
हुतात्मा स्मारकाची काही ठिकाणी डागडुजी करण्याची गरज आहे. ते काम मुंबई महापालिका, राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे केले जाईल. परंतु संजय राऊत, तुमची वैचारिक सुंता झाली आहे. तुम्ही ज्या हिंदुत्ववादी विचाराचा वारसा सांगत होता त्या विचारांना तडे जात तुम्ही आता अफजल खान, औरंगजेब यांचे विचार महाराष्ट्राला सांगायला लागलात. तुम्ही तुमच्या पक्षाची, तुमच्या वैचारिक अधिष्ठानाची काळजी घ्या आणि विचारांना गेलेले तडे दुरुस्त करण्याचे काम करा, असेही बन यांनी ठणकावले.