– तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन चा आरोप
नागपूर :- महावितरण कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना गुणवंत पुरस्कारांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी केला आहे. कंपनीच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावूनही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरणमधील कंत्राटी कामगार हे अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत काम करत असूनही त्यांना कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सन्मान किंवा प्रोत्साहन मिळत नाही. गुणवंत पुरस्कार देताना केवळ नियमित कर्मचाऱ्यांचाच विचार केला जातो, ही बाब अन्यायकारक आहे. कंत्राटी कामगार दिवसरात्र सेवा देत असताना त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुणवंत पुरस्कारांमध्ये कंत्राटी कामगारांचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत शासन व महावितरण प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.