spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई :- गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, यासाठी ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली.

रश्मी आंबेडकर म्हणाल्या की, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी तसेच गुणपत्रिका अभिलेख जतनासाठी संचालनालयाकडे अपलोड करणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती संबंधित क्रीडा संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे.

निर्धारित कालावधीत माहिती अपलोड न केल्यास संबंधित क्रीडा संघटनांचा डिफॉल्टर यादीत समावेश करण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंनी आपले ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी अपलोड करण्यात आलेल्या माहितीची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे.या नव्या प्रणालीमुळे खेळाडूंना पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक जलद व सुलभपणे मिळणार आहे.

यासाठी खेळाडू व संबंधित क्रीडा संघटनांनी क्रीडा विभागास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.