भंडारा :- वृद्ध कलावंतांच्या मानधनाचे प्रश्न आणि निवड समितीतील त्रुटींविरुद्ध ‘भंडारा जिल्हा संयुक्त कलाकार महासंघ’ व सामाजिक नेते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात अनोखे ‘संगीतमय आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते.
त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात झाली. डफ, बासरी, ढोलकी आणि टाळांच्या निनादात कलावंतांनी आपली व्यथा मांडली. यावेळी हनुमान, शंकर भगवान, लावणी नृत्यांगना आणि विविध वेशभूषेतील कलावंत सहभागी झाले होते. बस स्टॉप, पोस्ट ऑफिस चौक मार्गे ही रॅली काढण्यात आली. शाहीर भगवान दहिवले, सोमप्रभू तांदूळकर आणि कवी नाशिक चवरे यांनी गीतांमधून कलावंतांचे दुःख मांडले.
प्रमुख मागण्या:
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक कलावंत मानधन निवड समिती रद्द करावी. , जिल्ह्यातून किमान ५०० नवीन कलावंतांची मानधनासाठी निवड व्हावी , सन २०२५-२६ मधील प्रलंबित फाईल्स तात्काळ निकाली काढाव्यात , निवड समितीमध्ये पुरस्कारप्राप्त व नामांकित कलावंतांचा समावेश करावा.
आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कलावंतांनी काही काळ ‘रास्ता रोको’ केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन सुरू झाले. अखेर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मानधन समिती सचिव) नंदागवळी, अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. येत्या २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात भावेश कोटांगले, डॉ. पुरुषोत्तम बोंद्रे, नाशिक चवरे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कलावंत सहभागी झाले होते.





