– मनपाच्या ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
नागपूर :- वर्षानुवर्षे कचरा फेकण्याच्या सवयीचा भाग बनलेल्या गिट्टीखदान पेट्रोल पंपाजवळी ठिकाण आज कलात्मकतेने फुलले आहे. पूर्वी ज्या ठिकाणी नागरिक दररोज कचरा फेकायचे, ज्यामुळे हे ठिकाण कचरा घर असल्याचे भासत होते. आता नागपूर महानगरपालिकेने ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला एक नवीन कलात्मक दिशा देत, ‘वेस्ट टू आर्ट’ अर्थात ‘कचऱ्यातून कलाकृती’ संकल्पनेच्या आधारावर कार्य करीत या ठिकाणाचे रुपडे बदलले आहे. मनपाच्या मंगळवारी झोन मधील प्रभाग १० अंतर्गत येणाऱ्या गिट्टीखदान पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ठिकाणी उत्तम कलाकृती साकारत सुशोभीकरण करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात आयईसी, स्वच्छता चमू द्वारे ‘कचऱ्यातून कलाकृती’ संकल्पनेनुसार कलाकृती साकारण्यात येत आहे. या संकल्पनेचा मुख्य उद्देश केवळ ठिकाणाचे सौंदर्य वाढवणे हा नव्हे, तर नागरिकांमध्ये, पुनर्चक्रण (Recycling) आणि पुनःउपयोग (Reuse) याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासह, त्याचा योग्य वापर करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणा देणारा ठरत आहे.
मनपाच्या चमूद्वारे सीटीयु पॉईंटसाठी एक आकर्षक आणि अनोखी कंपाउंड वॉल तयार करण्यात आली आहे. याकरिता सुमारे १०० बांबूच्या काठ्या आणि ६९८ च्या जवळपास नारळाच्या खाली खोलचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वारण्यात आलेला बांबू हा शहरातील विविध घाटांवरून संकलित करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी असलेले दोन वाळलेले वृक्ष तोडण्याऐवजी, चमूने त्यांनाही या कलेचा भाग बनवले आहे. जुने कपडे आणि रंगीत वस्त्रांचा वापर करून या वाळलेल्या वृक्षांना जीवंत, कलात्मक रूप देण्यात आले आहे. या उपक्रमाने पर्यावरण संवर्धन आणि कला यांचा अप्रतिम संगम साधला गेला आहे.
सदर कलाकृती साकारण्यासाठी सर्वश्री. अविनाश दामडे, पीयूष खांडेकर, सन्नी नक्के, अर्पित मून, जतिन बिरहा, ऋषभ समुद्रे, आदित्य खापेंकर, निशांत वाघमारे, तुषार समुद्रे, हिम्मांशु दमनकर, आणि अंकित खोटे सहकार्य केले आहे.




