किशोर साहू, मौदा :– सध्या उन्हाच्या तडाख्याने नदी नाल्यांमधील पाणी पूर्णपणे आटल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरींना पाणी उपलब्ध नाही तरी पेच प्रकल्पातील लाभ क्षेत्रात असलेल्या नदी नाल्यालगतच्या गावांच्या पिण्याचे पाणी व जनावरांकरिता पाण्याची मागणी असल्यामुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार 40 क्युसेक्स पाणी उजव्या कालव्यात व 150 क्युसेक्स पाणी डाव्या कालव्यातून असे एकूण 190 क्युसेक्स पाणी दोन्ही कालव्यातून उद्या सोमवार (ता. 25 मे) ला सकाळी 6 वाजता सोडण्यात येणार आहे. तरी सर्व कालव्यांमधील गेट बंद ठेवण्यात यावे व काटनियंत्रक उचलण्यात यावे. शेतात पाणी जाऊन नुकसान तसेच पाण्याच्या अतिव्य होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या यशा सूचना संबंधित विभागांनी द्याव्यात, अशी पेच पाटबंधारे उपविभाग पारशिवनी येथील उपविभागीय अभियंता यांनी दिलेली माहिती सोशल मीडियावरील विविध ग्रुप वर भाजपा जिला उपाध्यक्ष तथा मौदा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य वीरेंद्र पायतोडे वायरल केलेली आहे.
यंदा सूर्य आग ओकू लागल्याने ज्या नदी नाल्यांचे पाणी संपूर्णपणे आटलेले आहे, त्या नदी नाल्यांना उद्या सकाळपासून पाणी यायला सुरुवात होणार असल्याने त्या नदी नाल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच चाचेर परिसरातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे निवेदन देणाऱ्या ग्रामपंचायत चाचेर च्या सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांचे आभार मानले.