खापा, वार्ताहर :- शहरातील बाजार चौक परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरीचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. बाजार चौकातील बँक ऑफ बडोदाच्या खाली असलेल्या एटीएमला लक्ष्य करत चोरट्यांनी एटीएम सेंटरबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून बाजूला ठेवला. त्यानंतर एटीएमच्या टाइल्स फोडून मशीन उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्याने एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली असून आर्थिक नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. ही घटना मंगळवारी १ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याच रात्री बाजार चौकातील भवानी माता मंदिराजवळ असलेल्या राजेश मालोकर यांच्या मालकीच्या ‘राजेश ज्वेलर्स’ या सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी बेंटेक्सचे दागिने, चांदीच्या अंगठ्या, चांदीच्या प्लेटा तसेच इतर साहित्य लंपास केले. याशिवाय दुकानातील वजनकाटाही चोरीस गेल्याची माहिती आहे.
चोरीस गेलेल्या साहित्याची अंदाजे किंमत व वजन याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसून, बेंटेक्स दागिने, चांदीच्या अंगठ्या, प्लेटा व इतर दागिने तसेच वजनकाटा असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे.
एकाच रात्री बाजार चौक परिसरातील एटीएम आणि ज्वेलर्सच्या दुकानाला लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या धाडसी चोरीमागे एकाच टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





