– नागपुरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्याचे लक्ष्य
नागपूर :- नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी तसेच पार्किंग व्यवस्थेच्या अडचणींवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १) मनपा मुख्यालयात रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थापन व संबंधित उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली.
बैठकीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, नागपूर शहर वाहतूक पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त मंगेश खवले, झोनचे सहाय्यक आयुक्त तसेच आयटीडीपी इंडिया, पीडीए पुणे आणि आयआरटीई या तज्ज्ञ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील वाहतूक कोंडीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रमुख रस्त्यांची नोंद करून तेथे होणाऱ्या अनधिकृत पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी झोनस्तरावर नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. प्रत्येक झोनमधील प्रमुख रस्त्यांवर उपलब्ध जागांचा शोध घेऊन नागरिकांसाठी योग्य ठिकाणी पार्किंगची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक रस्त्याचे मॅपिंग तातडीने तयार करून सादर करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.
शहरातील विविध झोनमधील वाहतूक कोंडीच्या प्रमुख ठिकाणांची नोंद करून प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून ती प्रभावीपणे दूर करण्याचे लक्ष्य बैठकीत निश्चित करण्यात आले. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी मनपाच्या माध्यमातून नियोजित व शिस्तबद्ध पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, पार्किंगची अधिकृत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही तिचा वापर न करता अनधिकृत ठिकाणी वाहने उभी करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ही निर्देश आयुक्तांनी दिले. यासाठी आवश्यक नियोजन, कार्यपद्धती आणि अंमलबजावणीची तयारी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सर्वंकष पार्किंग व्यवस्थापन व वाहतूक नियोजनाचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.





