भाविकांची गैरसोय टाळा, एसटी बसेसना परवानगी द्या – आमदार प्रविण दाटके यांची मागणी

0
88

 

नागद्वार यात्रेसाठी मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या बसेसना परवानगी मिळवून द्या  – आमदार प्रविण दाटके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर १८ : पचमढी (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या नागद्वार यात्रेसाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदाची यात्रा १९ ते ३० जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या काळात शेवटच्या पाच दिवसांत दररोज सुमारे १ लाख भाविक नागद्वारला जातात, त्यापैकी ८० हजार भाविक हे विदर्भ, विशेषतः नागपूर भागातून जातात.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदाही विशेष बससेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, मध्यप्रदेश परिवहन विभागाने २ जुलै रोजी एक पत्र काढून एसटी महामंडळाच्या ५२ ते ५५ सीटर बसेसऐवजी फक्त ४२ ते ४४ सीटर बसेसना परवानगी देण्यात येईल, असे कळवले आहे.
यामुळे एसटी महामंडळाच्या नियोजित सेवांना अडथळा निर्माण झाला असून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खासगी ट्रॅव्हल्सना वाहतुकीची परवानगी मिळालेली असताना एसटी बसेसना मर्यादा घालणे, हा दुजाभाव असल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूरचे आमदार प्रविण दाटके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देत मध्यप्रदेश शासनाशी समन्वय साधून एसटी महामंडळाच्या सर्व बसेसना निर्बंधाविना परवानगी मिळवून देण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, “एसटी महामंडळ हे शासकीय उपक्रम असून भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी एसटी बसेसना पूर्ण परवानगी मिळणे आवश्यक आहे.”