spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्मार्ट मीटर सक्ती विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे देशव्यापी आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना ‘कंदील’ भेट देऊन नोंदवला निषेध

– ३२ राज्यांतील ६५० जिल्ह्यांत पडसाद; बळजबरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘एफआयआर’ करण्याची मागणी

हंसराज, भंडारा :- केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात, विशेषतः जनतेवर लादल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट मीटर’च्या सक्तीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने (BMP) देशव्यापी एल्गार पुकारला आहे. ३२ राज्यांतील ६५० जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे जनआंदोलन छेडण्यात आले. भंडारा येथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत प्रशासनाला ‘लालटेन’ (कंदील) भेट देऊन सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी “स्मार्ट मीटर धोका है, लात मारो मौका है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

कायद्याचे उल्लंघन आणि ग्राहकांची लूट याप्रसंगी बोलताना ‘इलेक्ट्रिक मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले बहुजन मुक्ती पार्टीचे नेते अभय डी. रंगारी म्हणाले की, “ग्राहक कायदा २००३ नुसार स्वतःचे मीटर निवडण्याचे अधिकार ग्राहकांना असतानाही, खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार बळजबरीने स्मार्ट मीटर लादत आहे. घरमालक घरी नसताना जुने साधे मीटर काढून त्याजागी डिजिटल, प्रीपेड रिचार्ज मीटर बसवले जात आहेत. यामुळे वीज बिले अवाढव्य येत असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढीव बिलांमुळे काही ग्राहकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर येत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

ग्रामसभांनी ठराव घेण्याचे आवाहन स्मार्ट मीटरच्या संकटातून वाचण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेने स्मार्ट मीटर विरोधात ठराव पास करावा, असे आवाहन पार्टीतर्फे करण्यात आले. तसेच, कायद्याचे उल्लंघन करून ग्राहकाच्या संमतीविना बळजबरीने मीटर लावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ ‘एफआयआर’ (FIR) दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.

बहुजन मुक्ती पार्टीने केवळ स्मार्ट मीटरच नव्हे, तर वाढत्या महागाई विरोधातही आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे:

दुसरा चरण (२० मे २०२६): वाढत्या घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती व तुटवड्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चूल पेटवा’ धरणे आंदोलन करण्यात येईल.

तिसरा चरण (३१ मे २०२६): डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व विद्युत विभागाला निवेदन देताना बहुजन मुक्ती पार्टीचे सुभाष भिवगडे, विजयकांत बडगे, भारत बन्सोड, मुकुल सूर्यवंशी, अभय डी. रंगारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.