spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाळासाहेबांनी उद्धव, राऊतांना जाब विचारला असता

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची टीका

मुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाविरोधात उद्धव ठाकरे, उबाठा गट आणि संजय राऊतांनी चकार शब्द काढला नाही. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊतांना याबद्दल जाब विचारला असता. उद्धव ठाकरे यांनी आपली आमदारकी आणि राऊतांनी त्यांची खासदारकी कायम ठेवण्यासाठी काँग्रेसपुढे लोटांगण घातले अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. वंदनीय बाळासाहेब असते तर त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले असते. मात्र उद्धव ठाकरे, राऊतांना काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात साधे ट्वीटही करावेसे वाटले नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसची चमचेगिरी केल्याने सच्चा शिवसैनिक दुरावेल

पत्रकार परिषदेतून चंद्रपूरमध्ये उबाठा गट भाजपा सोबत जाणार नाही अशा मोठमोठ्या बाता करणा-या राऊतांची पत्रकार परिषद संपायच्या आत चंद्रपूरमध्ये भाजपाचा महापौर विराजमान झाला. चंद्रपूरमधील स्वाभिमानी नगरसेवकांनी हिंदुत्वासाठी भाजपाची साथ दिली. मात्र उद्धव त्यांची आमदारकी आणि राऊत त्यांची खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसचे लांगुलचालन करण्यात मग्न होते. काँग्रेसची चमचेगिरी केल्यामुळे सच्चा शिवसैनिक तुमच्या सोबत रहाणार नाही असा इशारा बन यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या विचारांचा विसर उद्धव ठाकरे, राऊतांना पडला आहे पण भाजपाला कधीही विसर पडणार नाही या शब्दांत बन यांनी राऊतांवर पलटवार केला. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे हीच भूमिका भाजपाची होती. मात्र काही कथित पर्यावरणवाद्यांनी याला आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली आणि स्थगिती मिळवली. त्यामुळे अरबी समुद्रातील स्मारकाचे काम थांबले हे वास्तव आहे. मात्र शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे पुनरुज्जीवन, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवून सुशोभिकरणाची कामे भाजपा महायुती सरकराने केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि त्यांचा वैभवशाली इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी प्रयत्न करणारे भाजपा महायुती सरकार आहे असेही ते म्हणाले.

भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत आहे. भाजपाचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षासोबत जाणार नाहीत असा विश्वास आहे. मात्र कोणी असा अविचार केला तर पक्षपातळीवर त्याची दखल घेण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे बन यांनी स्पष्ट केले.

भाजपा महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही

भाजपा महायुती सरकारमध्ये लाचखोरांची गय केली जात नाही. मंत्रालयामधील लाचखोरावर कारवाई करून लिपीकाला पोलीस कोठडीत टाकले असून प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. भाजपा महायुती सरकारचे जनतेच्या कामांनाच सातत्याने प्राधान्य आहे, असेही बन यांनी नमूद केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.