हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- सोशल मीडियाचा वापर करून एका महिलेचे बनावट फोटो तयार करणे आणि ते व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल करून तिची सामाजिक बदनामी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भंडारा सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत गोंदिया जिल्ह्यातील एका १८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. केवळ ‘मस्करी’ करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे गावातील एका पुरुषासोबतचे बनावट आणि आक्षेपार्ह फोटो ‘RK Bha’ नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करण्यात आले होते. हे फोटो एडिट करून (बनावट) तयार करण्यात आले होते. यामुळे संबंधित महिलेची समाजात मोठी बदनामी झाली. या प्रकारानंतर पीडित महिलेने भंडारा सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी यांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. ज्या मोबाईल क्रमांकावरून आणि ज्या ग्रुपवरून हे फोटो व्हायरल झाले होते, त्याचा मागोवा घेतला असता आरोपीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
तपासादरम्यान, संजय भक्तराज चव्हाण (वय १८ वर्षे, रा. अदासी, ता. जि. गोंदिया) याने हा बनावट फोटो तयार करून तो ग्रुपवर टाकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता, आपण केवळ मस्करी करण्याच्या उद्देशाने हा ग्रुप तयार केला आणि फोटो प्रसारित केले, अशी कबुली आरोपीने दिली. मात्र, या ‘मस्करी’मुळे एका महिलेची प्रतिमा मलिन झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पाटील, स.फौं. गजभिये, पो. हवा. पराग राऊत, पोलीस हवालदार आंबेडारे व सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.




