– वार्षिक योजनेचा आराखडा वाढवण्याची पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती; फिश मार्केट, क्रीडा संकुल व पायाभूत सुविधांवर भर
हंसराज, प्रतिनिधीभंडारा :- सन 2026-27 या वर्षासाठी भंडारा जिल्हयासाठी एकूण मागणी रू. 527.71 कोटीची असून त्यापैकी जिल्हा नियोजन समितीने राज्यस्तरीय बैठकीमध्ये रू.264 कोटीची अत्यावश्यक अतिरीक्त मागणी शासनाकडे नोंदविली आहे.भंडारा जिल्हयातील विकासकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात वाढ करून द्यावी अशी विनंती पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील आरोग्य् सेवेतील पायाभुत सुविधांचा विकास, तसेच महिला बाल सशक्तीकरण, शैक्षणीक दर्जा वाढीसाठी पायाभुत सुविधांवर भर देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात भंडारा जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात वाढ करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली.
मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचे आराखडे अंतिम करण्यासंदर्भात मुंबई येथे काल राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्यासोबत आमदार नाना पटोले, आमदार राजु कारेमोरे हे देखील मुंबई येथे बैठकीस उपस्थित होते. भंडारा येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सावनकुमार, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिडडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला 276 कोटी रुपये मंजूर होते. पुढील वर्षाकरीता विविध कार्यान्वीत यंत्रणांनी 527 कोटींची मागणी नोंदवली आहे. त्या मागणीस अनुसरून जिल्हा नियोजन समितीने एकुण 264 कोटी रूपयांची प्रस्तावित अतिरीक्त निधी जिल्हयातील विविध विकास कामांकरीता लागणार असल्याने वार्षिक योजनेच्या आराखड्यात वाढ करून देण्याची विनंती पालकमंत्र्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
यामध्ये प्रामुख्याने जिल्हा ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, जिल्हयातील विविध पर्यटन स्थळांची प्रचार प्रसिध्दी करणे, जिल्हयामध्ये मॉडेल कार्यालये बनविणे जेणेकरून सामान्य नागरीकांना सोयी सुविधा शीध्रतेने मिळतील या कामांचा समावेश आहे.तर मुख्यमंत्री समृध्द गाव योजनेंतर्गत सहभागी झालेल्या गावांना अधिकाधिक स्वयंपूर्ण करून आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे भोयर यांनी सांगितले.
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा असून येथील रोहू, कतला, तिलापिया या माशांना प्रचंड मोठया प्रमाणात मागणी आहे, त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हयात फिश मार्केटचा प्रकल्प उभारण्याबाबत विनंती केली असता त्यास अर्थसंकल्पात समाविष्ट करणेबाबत मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले.
कयाकिंग व कॅनायिंग या खेळासाठी जिल्हयात अनुकूल वातावरण आहे. तरी त्या अनुषंगाने खेळाडू प्रशिक्षण संकुल बनविण्यास मंजूरी मिळणेबाबत जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याचे सादरीकरण केले. त्यामध्ये जिल्हयाचे वार्षिक नियोजन करताना मुख्यत्वाने नागरी क्षेत्राच्या पायाभुत सुविधांचा विकास, अपारंपारिक उर्जा व उर्जा विकास ,ग्रामीण विकास,परिवहन,गडकिल्ले विकास,हरीत महाराष्ट्र, आरोग्य सुविधांचा विकास, महिला व बालकांचे सशक्तीकरण, गतिमान प्रशासन, क्रीडा कलागुणांचा विकास यावर या नियोजनात भर देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
यावर्षी झालेला खर्च व पुढील वर्षी आवश्यक निधीची माहिती त्यांनी सादर केली. सन २०२५-२६ मध्ये रू.२७६ कोटीपैकी रू.१३५ कोटी एवढा निधी खर्च झाला असल्याबाबतदेखील जिल्हाधिकारी यांनी बैठकीत स्पष्ट केले.
जिल्हयात एमआयडीसी उभारणीकरीता शासकीय जागेचा शोध घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वार्षिक योजनेत रास्त वाढ देण्यात येईल असे सांगितले.








