– डिजिटल युगात मानवी नातेसंबंध दृढ करण्यासाठी भारतीय टपाल विभागाची पुढाकार
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक पत्रलेखनाची सवय कमी होत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर मानवी भावना, संवाद आणि नात्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागातर्फे ‘मित्र-मैत्रिणीला पत्र लिहा’ या विषयावर जिल्हास्तरीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट पत्रलेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ही स्पर्धा १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी खुली असून जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेचा विषय
या उपक्रमाचा मुख्य विषय डिजिटल युगातील मानवी नातेसंबंध हा आहे. विद्यार्थी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला उद्देशून पत्र लिहिताना डिजिटल माध्यमांमुळे संवादपद्धतीत झालेला बदल, नात्यांवरील परिणाम आणि प्रत्यक्ष पत्रलेखनाचे महत्त्व याविषयी आपले विचार मांडू शकतात.
नियम व अटी
स्पर्धेसाठी पत्राची कमाल शब्दमर्यादा ८०० शब्द निश्चित करण्यात आली आहे. सहभागी विद्यार्थी मराठी, हिंदी किंवा
इंग्रजी या कोणत्याही भाषेत पत्र लिहू शकतात. पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणे आवश्यक असून त्यामध्ये नाव,
पूर्ण पत्ता, शाळा/महाविद्यालयाचे नाव व संपर्क क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेची पातळी व बक्षिसे
जिल्हास्तरावर निवड झालेल्या उत्कृष्ट पत्रांना राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरही स्पर्धकांना पारितोषिक जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्हास्तरावरील पारितोषिके :
प्रथम – ₹५०,०००
द्वितीय – ₹२५,०००
तृतीय – ₹१०,०००
राज्यस्तरावरील पारितोषिके :
प्रथम – ₹५०,०००
द्वितीय – ₹२५,०००
तृतीय – ₹१०,०००
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
स्पर्धेसाठी प्रवेशिका व पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली पत्रे संबंधित टपाल कार्यालयात वेळेत जमा करावीत.
“डिजिटल युगात संवाद साधण्याच्या पद्धती बदलल्या असल्या तरी पत्रलेखनातून व्यक्त होणारी आत्मीयता आणि भावनिक जवळीक विशेष असते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या लेखनकौशल्याचा विकास करावा आणि मानवी नातेसंबंधांचे मूल्य जपावे”
— अ. श्रीनिवासा राव, वरिष्ठ डाक अधीक्षक, नागपूर ग्रामीण विभाग




