spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा पोलीस भरती: दुसऱ्या दिवशी ८५४ उमेदवारांची हजेरी; १६०० मीटर धावण्यात लागला तरुणांचा कस

– बायोमेट्रिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक प्रक्रियेवर भर

– १,१०० पैकी ८५४ उमेदवारांची उपस्थिती

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेचा दुसरा दिवस गुरुवारी (१२ फेब्रुवारी) पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडला. पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या थेट नियंत्रणाखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे.

भरतीच्या दुसऱ्या दिवशी एकूण १,१०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ८५४ उमेदवारांनी हजेरी लावली असून, ७८६ उमेदवारांनी प्रत्यक्ष शारीरिक क्षमता चाचणीत सहभाग नोंदवला. आजच्या सत्रात प्रामुख्याने १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी आधुनिक उपकरणांची आणि बायोमेट्रिक पद्धतीची मदत घेतली जात आहे.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. मैदानावर उमेदवारांची ओळख पटवणे, कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमापे घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर आधारित असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

११ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही मैदानी चाचणी प्रक्रिया १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण ३,७५८ उमेदवारांनी नोंदणी केली असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे.

Popular Articles