spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘भैयाशी बोला’ म्हणत १.८० लाखांचे मंगळसूत्र लंपास

– तुमसर येथील घटना; लग्नाहून परतणाऱ्या महिलेची फसवणूक

हंसराज,प्रतिनिधी भंडारा तुमसर :- लग्नाहून परतणाऱ्या एका महिलेला बोलण्यात गुंतवून अज्ञात चोरट्याने १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना तुमसरमध्ये घडली. हनुमान नगर भागातील शास्त्री पुतळ्याजवळ मंगळवारी रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली.

पल्लवी मनोज बडवाईक (३३) ही महिला राजाराम लॉन येथील लग्नाचा कार्यक्रम आटोपून आपल्या मैत्रिणीसोबत घरी परतली होती. घरासमोर मैत्रिणीच्या स्कुटीवरून उतरून ती उभी असताना, काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक अज्ञात इसम तिथे आला. “हे घ्या, भैयाशी बोला,” असे म्हणत त्याने पल्लवी यांच्यासमोर फोन केला. त्या काही समजण्याच्या आतच, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

हिसकावलेल्या मंगळसूत्राची किंमत १ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पल्लवी बडवाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सयाम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.