हंसराज,भंडारा तुमसर :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच तुमसर येथील काँग्रेस कार्यालयात उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले, जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर, प्रदेश सरचिटणीस जिया पटेल आणि जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोहाडी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्यासह पक्षाच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या बैठकीत पक्ष संघटना तळागाळापर्यंत नेण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील पक्षाच्या निरीक्षकांनी दरमहा गावांमध्ये २४ तास मुक्काम करून बूथ कमिटी, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधावा, अशा सूचना जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी दिल्या. तसेच सर्व सेल व आघाड्यांनी आठवड्याभरात कार्यकारिण्या सादर कराव्यात आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे विचार पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार नाना पटोले यांनी आगामी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सक्रिय राहण्याचे आवाहन करतानाच, राज्यातील दुष्काळसदृश स्थिती व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिया पटेल यांनी आगामी आंदोलनांची रूपरेषा मांडली, तर जयश्री बोरकर यांनी महिला संघटनेच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले. ‘पदापेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे’ या भावनेतून जिल्ह्यात काँग्रेस अधिक मजबूत करण्याचा एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








