spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्हा काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार; ‘काँग्रेस नवचेतना अभियाना’ची घोषणा

हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार व नियुक्तीपत्र वाटप समारंभ गुरुवारी साखरकर सभागृह, शास्त्री चौक येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘काँग्रेस नवचेतना अभियान’ व ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रमाची घोषणा केली.

कार्यक्रमाला माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, प्रदेश महासचिव जिया पटेल, सचिव जय डोंगरे, मधुकर लिचडे, प्रमोद तितीरमारे, अश्विन नशिने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुकुंद साखरकर म्हणाले की, पद हा केवळ सन्मान नसून ती मोठी जबाबदारी आहे. संघटनेला नवी ऊर्जा देण्यासाठी जिल्ह्यात ‘काँग्रेस नवचेतना अभियान’ राबविले जाईल. या अंतर्गत प्रत्येक आठवड्यात दोन तालुक्यांचा दौरा करून बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. तसेच, जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद क्षेत्रांत ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल.

आमदार नानाभाऊ पटोले यांनी स्व. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीचा आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या त्यागाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघर्षाची प्रेरणा दिली. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांनी एसी कार्यालयात न बसता थेट जनतेच्या बांधावर आणि घरापर्यंत जावे, असे आवाहन केले. साखरकर यांनी सुरू केलेल्या नवीन अभियानाचे पटोले यांनी स्वागत केले.

यावेळी जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त उपाध्यक्ष, सरचिटणीस व सचिवांना नियुक्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन महासचिव शीलवंत कुमार मडामे यांनी केले, तर आभार तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे यांनी मानले..

Popular Articles