Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा एलसीबीची मोठी कारवाई: ७० वर्षीय वृद्धेची फसवणूक करणारी महिला जेरबंद; २४ हजारांचे सोने जप्त

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- बस स्थानकावर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एका महिलेची सखोल चौकशी केली असता, एका ७० वर्षीय वृद्धेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) भंडाराच्या प्रॉपर्टी पथकाने याप्रकरणी कौशल्याने तपास चक्रे फिरवून आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडून २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तुमसर बस स्थानक येथे नागे हिरणबाई पारधी (वय ७० वर्ष) या वृद्ध महिलेला एका अनोळखी महिलेने गाठले. बोलण्यात गुंतवून आणि फसवणूक करून या आरोपी महिलेने वृद्धेच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आणि तिथून पळ काढला. या घटनेची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथील प्रॉपर्टी पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान आणि घटनास्थळावरील वर्णनावरून ही चोरी गोंदिया येथील एका सराईत महिला गुन्हेगाराने केल्याचा संशय पोलिसांना आला. तेव्हापासून पोलीस या महिलेच्या मागावर होते. १२ मार्च २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, संबंधित वर्णनाची महिला भंडारा बस स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी पथकाने तात्काळ भंडारा बस स्थानक गाठले आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला. तिच्याकडून ३० सोन्याचे मणी आणि १ सोन्याचे डोरले (एकूण वजन ३ ग्रॅम, किंमत २४,००० रुपये) हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३३५/२६, कलम ३१८ (४) भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. विवेक सोनवने, पोलीस हवालदार प्रदीप डाहारे, सतिश देशमुख, पोलीस शिपाई चेतन पोटे, सचिन देशमुख, शुभम ठाकरे, कौशीक गजभीये आणि महिला पोलीस शिपाई तेजस्विनी लिल्हारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.