spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्हा पोलीस शिपाई भरती: १५ मार्चला लेखी परीक्षा; उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा असलेल्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत पार पडणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने या परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून उमेदवारांना वेळेवर हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

लेखी परीक्षेसाठी जे.एम. पटेल कॉलेज, मुस्लीम लायब्ररी चौक, भंडारा हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. सर्व पात्र उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी म्हणजेच १५ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे ‘महाआयटी’ विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षेला येताना उमेदवारांनी खालील गोष्टी सोबत आणणे अनिवार्य आहे:

🔹 महाआयटी विभागाने दिलेले प्रवेशपत्र (Admit Card).

🔹 शासकीय ओळखपत्र (आधार कार्ड/निवडणूक ओळखपत्र इ.).

🔹 शारीरिक चाचणीच्या वेळी देण्यात आलेला ‘कापडी चेस्ट क्रमांक’.

🔹 प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणे स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो.

पेन आणि पॅड पोलीस दलातर्फे मिळणार

विशेष म्हणजे, परीक्षेसाठी लागणारे पेन आणि रायटिंग पॅड पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा यांच्यामार्फतच पुरविले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वरील कागदपत्रांशिवाय इतर कोणतेही शैक्षणिक साहित्य किंवा स्टेशनरी सोबत नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, गणकयंत्र (Calculator), डिजिटल डायरी, मायक्रोफोन, इअरफोन, ब्लूटूथ यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सक्त मनाई आहे. कोणत्याही उमेदवाराकडे अशी उपकरणे आढळल्यास किंवा तो बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करताना दिसल्यास, त्याच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच अशा उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेतून कायमचे अपात्र ठरवले जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Popular Articles