हंसराज,भंडारा/तुमसर :- जिल्ह्यात अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात भंडारा जिल्हा पोलीस दलाने जोरदार मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा मेहगाव शिवारात सापळा रचून धाडसी कारवाई करत बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २ किलो निव्वळ गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गंगवानी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा मेहगाव येथे संशयित इसम अमली पदार्थांची वाहतूक करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून हिरवट-काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या व बिया असलेला सुका गांजा (एकूण वजन २.१२० कि.ग्रॅ., प्लास्टिक पिशवी वगळता निव्वळ २.०० कि.ग्रॅ. गांजा, अंदाजे किंमत रु. ४०,०००/-) मिळून आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गांजा वाहतुकीसाठी वापरलेली निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड (क्रमांक: MH 36 AQ 8713, किंमत रु. ८०,०००/-) आणि आरोपीकडील एक वनप्लस (Oneplus) कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (किंमत रु. ३०,०००/-) असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल सुरेश गजभिये (वय ३५ वर्षे, रा. आंबागड, ता. तुमसर, जि. भंडारा) आणि विलास झीबल मडावी (वय ३६ वर्षे, रा. हरदोली/आंबागड, ता. तुमसर, जि. भंडारा) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी हा गांजा आरोपी पिंटु उर्फ प्रशांत निखाडे (रा. तुमसर) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यावरून तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २० (ब) ii (ब), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ (NDPS Act 1985) अन्वये अप. क्र. १००६/२०२६ नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
सदर यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गंगवानी, पोलीस अंमलदार गाढवे, डोयले, मते, बेदुरकर, साकुरे, मलधाम व साठवणे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.





