– चारचाकी कार, चार दुचाकी आणि मोबाईलसह ६ जण ताब्यात; दोघे फरार, गुन्हा दाखल
हंसराज, भंडारा :- शहरातील देशबंधू वार्ड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडारा शहर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून रोख रकमेसह चारचाकी वाहन, चार दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ९ लाख ४५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार झाले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशबंधू वार्ड येथे काही व्यक्ती ५२ पत्त्यांवर पैशांची हारजीत लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार कुरंजेकर व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी तिथे जुगार सुरू असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पूनम तिवारी (वय ५०, रा. देशबंधू वार्ड, भंडारा), व्यंकटेश लांजेवार (वय ३०, रा. शुक्रवारी पांढराबोडी रोड, भंडारा), रूपेश नेवारे (वय २७, रा. झाकीर हुसेन वार्ड, भंडारा), रविंद्र पडोळे (वय ३५, रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड, सहकार नगर, भंडारा), मयुर वसानी (वय ३१, रा. खांबतलाव रोड, देशबंधू वार्ड, भंडारा) आणि सुरेश आंबडारे (वय ४९, रा. टेकेपार-डोडमाझरी, भंडारा) यांना ताब्यात घेण्यात आले. तर गोलू उर्फ आशु नेवारे (वय ३२, रा. देशबंधू वार्ड, भंडारा) आणि आकाश भजनकर (वय ३०, रा. केसलवाडा रोड, शुक्रवारी, भंडारा) हे दोघे पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयितांच्या अंगझडतीतून १० हजार ९५० रुपये आणि जुगाराच्या फळावरून ४ हजार ९५० रुपये अशी एकूण १५ हजार ९०० रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय ५२ ताश पत्ते, ७० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, ८ लाख ६० हजार रुपये किमतीची एक चारचाकी कार व चार मोटारसायकल असा एकूण ९ लाख ४५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १९३५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजभिये, पोलीस हवालदार पुराम, पोलीस हवालदार कुरंजेकर, पोलीस नाईक वालदे तसेच पोलीस शिपाई काळे, अंबादे, माटे व पेशने यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.





