– मोहिमेत उमेश मोहतुरे यांचा कुटुंबासह सहभाग
हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यात सध्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि पडताळणीची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत भंडारा तालुक्यातील इंदुरखा येथे उमेश मोहतुरे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह स्वतःचा अर्ज भरून सहभाग नोंदवला. यावेळी स्थानिक बीएलओ एकता मानकर या नागरिकांचे अर्ज भरून घेण्याचे काम करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून या मोहिमेत आपले नाव नोंदवावे किंवा पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मोहतुरे यांनी केले आहे.
सध्या ग्रामीण भागात भात पीक लागवडीचा (धान लावणी) मुख्य हंगाम सुरू आहे. या कामामुळे शेतकरी आणि शेतमजूर सकाळीच घराबाहेर पडतात. दिवसा बीएलओ गावात आल्यावर शेतकरी घरी उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या परिस्थितीमुळे मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी आणि मजुरांचा रोजगार बुडू नये यासाठी जिल्हाधिकारी, निवडणूक विभाग आणि तहसीलदारांनी बीएलओ यांना सकाळी ८ वाजता गावात उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उमेश मोहतुरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सकाळी लवकर काम सुरू झाल्यास शेतमजुरांचा वेळ वाचेल आणि त्यांना शेतीवर जाण्यापूर्वी मतदार यादीचे काम पूर्ण करता येईल. यामुळे शासकीय मोहिमेला गती मिळून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, असा विश्वास मोहतुरे यांनी व्यक्त केला आहे. सध्या इंदुरखा परिसरात या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने वेळेत बदल केल्यास मोहिमेची व्याप्ती वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.




