हंसराज,भंडारा तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील नवीन बसस्थानक परिसरात दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तुमसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने १५ जुलै २०२६ रोजी ही कारवाई केली असून आरोपीकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२६ रोजी रेखा सहेंद्र पारधी (वय ३२, रा. देवरीदेव) या माहेरी येरली येथे एका लग्नकार्यासाठी गेल्या होत्या. लग्न आटोपून आपल्या मुलीसह परत जाण्यासाठी त्या तुमसरच्या नवीन बसस्थानकावर आल्या. बसमध्ये बसत असताना त्यांना त्यांच्या हँडबॅगमधील पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये १८ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम सोन्याचे मणी, १५ हजार रुपयांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, ९ हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि ५०० रुपये रोख असा एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. या तक्रारीवरून तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्र. ३७९ /२०२६ कलम ३०३(२)बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पो.नि सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखाली तुमसर डी. बी पथकाने अथक प्रयत्न करून तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक माध्यमांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कन्हान येथील एका संशयित महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. या चौकशीत अंतकला रवी शेंडे (वय ४०, रा. कन्हान, जि. नागपूर) हिने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख २६ हजार रुपये किमतीची १४ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे आणि बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात दिलीप धावडे, रामटेके, बळदे, गिरीपुंजे, झंझाड, बावने, दमाहे, वाघ आणि कडव या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




