spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात ‘जागतिक कौशल्य सप्ताह’ उत्साहात साजरा

हंसराज,भंडारा लाखनी :- येथील स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात ‘जागतिक कौशल्य सप्ताह’ (१३ ते १८ जुलै) निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या सप्ताहाचे उद्घाटन आणि विशेष सेमिनार मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या परिपत्रकानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, व्याख्यान, निबंध स्पर्धा, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार-स्वयंरोजगार मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, “तरुणांना सन्माननीय नोकरी आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ म्हणून घोषित केला. समाजातील तळागाळातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे.”

महाविद्यालयाचे आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे यांनी ‘मुख्यमंत्री जिल्हा कौशल्य विभाग’ योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रुपये मानधन (विद्यावेतन) दिले जाते. हे ११ महिन्यांचे प्रशिक्षण तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. मनीषा सपाटे यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यात त्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून सप्ताहाच्या आयोजनाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता सिंगनजुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वरी रहांगडाले यांनी मानले.

या प्रसंगी प्रा. कवी सूर्यवंशी, प्रा. मुनेश्वर हलमारे, प्रा. मंगेश कुकडे, प्रा. यशोमती कागदे, प्रा. स्वप्नील उमरकर, प्रा. गाढवे, डॉ. अनुराधा खाडे, प्रा. श्रद्धा बोरकर, डॉ. सुधीर सहारे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘महाराष्ट्र गीता’ने करण्यात आली.

Popular Articles