नागपूर २९ : “ऑपरेशन थंडर – एकत्र येवुया, नशामुक्त समाज घडवुया” या मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एम.डी. पावडर बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.२७ ऑगस्ट २०२५ रोजी वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत, जय बजरंग किराणा स्टोअर्स समोर, स्वामी नारायण मंदिर मागे, श्रावण नगर येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी ह्युंदाई व्हर्ना कारजवळ मोपेडसह उभा असलेला सुरज भिम कोसरे (वय २४, रा. श्रावण नगर, वाठोडा, नागपूर) यास ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीतून ५५ ग्रॅम एम.डी. पावडर मिळाली. तसेच मोबाईल फोन, ह्युंदाई व्हर्ना कार व मोपेडसह एकूण ८,३७,६५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने चौकशीत आपल्या साथीदार आशिष दिलीप काळे (वय ३२, रा. चैतन्येश्वर नगर, वाठोडा रोड, नागपूर) यांच्या मदतीने एम.डी. पावडर आणल्याचे कबूल केले. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही पावडर विक्रीसाठी बाळगत असल्याचे स्पष्ट झाले.
सदर गुन्हा कलम ८(क), २२(क), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. मुद्देमालासह आरोपीला वाठोडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पाहिजे आरोपीच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गजानन गुल्हाने, पोउपनि. नागेश पुन्नावाड, पोहवा. पवन गजभिये, अरविंद गेडेकर, विवेक अढाऊ, मनोज नेवारे, मपोहवा. अनुप यादव आणि पोअं. राहुल पाटील यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आली.




