मुंबई २९ : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली. त्यांच्या या आंदोलनाला हजारो मराठा बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.
सरकारकडून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, सरकारने गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
याआधी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र पोलिसांना अटी-शर्ती मान्य करणारे हमीपत्र दिल्यानंतर एक दिवसासाठी परवानगी देण्यात आली. आज पहाटेच जरांगे यांचा ताफा मुंबईत दाखल झाला व सकाळी १० वाजता त्यांनी आझाद मैदानावर पोहोचून उपोषण सुरू केले.
उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी आंदोलकांना संबोधित करताना जरांगे म्हणाले,
“आधी सरकारने सहकार्य केले नाही म्हणून आम्ही मुंबईत आलो. पण आता परवानगी दिली आहे. गोंधळ नको, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. एकजुटीमुळे समाज बळकट होईल, याचा विचार करा.”
“आता मागे हटणार नाही”
जरांगे पुढे म्हणाले की, “सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मरण पत्करीन पण हटणार नाही. मराठा समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे.”
मुख्यमंत्र्यांना जरांगे चे आवाहन
मुख्यमंत्र्यांना उद्देशून जरांगे म्हणाले की,“हीच वेळ आहे मराठा समाजाचं मन जिंकण्याची. आमच्या मागण्या त्वरित मान्य करा. समाजाच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. सरकारने गोळ्या झाडल्या तरी मी मागे हटणार नाही; याच ठिकाणी उपोषण करत प्राण देईन.”




