spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुन्हेशाखा युनिट ३ ची मोठी कामगिरी; पोलीस असल्याची बतावणी करून २८ हजारांची जबरी चोरी करणारा आरोपी जेरबंद  

 

नागपूर :– शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट पोलीस असल्याचे भासवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखा युनिट ३ च्या पथकाने अवघ्या काही तासांत गजाआड केले. घटना १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी घडली. फिर्यादी करण पांडुरंग पखाले (वय ४९, रा. धम्मदीप नगर, बिनाकी ले-आउट, पंचवटी नगर, नागपूर) हे लालगंज झाडे चौकातून अॅक्टीव्हा (क्रमांक MH 49 A 6634) वरून जात असताना, ग्रे रंगाच्या अॅक्टीव्हा (क्रमांक MH 49 AV 4622) वर आलेल्या व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगत त्यांना थांबवले. गाडीची तपासणी करण्याच्या बहाण्याने आरोपीने डिकीत ठेवलेली २८,००० रुपये रोख रक्कम उचलली आणि “तुमच्या गाडीवर मोठा दंड बाकी आहे” असे सांगून पीडितास लकडगंज पोलीस ठाण्यात बोलावून स्वतः मात्र रक्कम घेऊन पसार झाला. तक्रारीनंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हेशाखा युनिट ३ ने तांत्रिक तपास करून आरोपी ओळखला आणि तो बजाजनगर परिसरात असल्याचे लक्षात आल्यावर सापळा रचून त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुधीर बाबाराव लोखंडे (वय ५४, रा. प्लॉट नं. २, गांधीनगर, रेणुका सरस्वती अपार्टमेंट, L.A.D. मेट्रो स्टेशन जवळ, बजाजनगर, नागपूर) असे आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा गाडी (MH 49 AV 4622) आणि रोख २८,००० रुपये असा एकूण १,०८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहायक आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोनि. अनिल ताकसांडे, पोउपनि. मधुकर काठोके, पोहवा. संतोषसिंह ठाकुर, पोअं. चंद्रशेखर डेकाटे, जितेश रेड्डी, दीपक दासरवार आणि दीपक लाखडे यांचा समावेश होता.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.