spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धान व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश!

– अन्न व नागरी पुरवठा विभागाचे तातडीचे निर्देश; ३ व ४ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा होणार.

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभाव केंद्रांवर धान व भरडधान्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळाले नव्हते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अन्न व नागरी पुरवठा विभागाने संबंधित संस्थांना चुकारेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

पणन हंगाम २०२५–२६ मध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत शासनाकडे धान व भरडधान्य विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या चुकारांबाबत निर्माण झालेला विलंब आता दूर होणार आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या ठोस व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मंगळवार, ३ फेब्रुवारी व बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चुकारे अदा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान्य विक्री करूनही चुकारे वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. या विषयावर आमदार डॉ. परिणय फुके यांनी वित्त विभाग, संबंधित अभिकर्ता संस्था तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधत शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली आणि हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनस्तरावरून वित्त विभागाकडून प्राप्त होणारा निधी अभिकर्ता संस्थांना तात्काळ वितरित करण्याचे निर्देश वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना देण्यात आले आहेत. तसेच अभिकर्ता संस्थांनी प्राप्त निधी क्षेत्रीय यंत्रणांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात विहीत पद्धतीने जमा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

यानुसार, ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वित्तीय सल्लागार व उपसचिवांनी, तर ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अभिकर्ता संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. फुके

या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या धान व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकरी हितासाठी सातत्याने लढणाऱ्या आमदार डॉ. परिणय फुके यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे आमदार डॉ. फुके यांनी यावेळी स्पष्ट केले.

Popular Articles