spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

झोन सभापतीपदी भाजपचे ८ तर २ जागी काँग्रेसचे सभापती

– अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रुपाली ठाकूर

नागपूर :- शहरातील दहा झोन सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार 8 अविरोध निवडून आले तर आशीनगर व मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसचे उमेदवार सभापतीपदी निवडून आले आहेत.

शहरातील दहा झोन सभापती तसेच अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतीपदासाठी आज (ता. 17) मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात निवडणूक पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काम पाहिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकित व अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण मेहरे निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.

मनपाच्या दहाही झोन सभापतीपदासाठी पीठासीन अधिकाऱ्यांनी झोनच्या अनुक्रमानुसार निवडणूक प्रक्रिया राबविली. यात लक्ष्मीनगर झोन क्र.१च्या सभापतीपदासाठी भाजपच्या श्रीमती तारा (लक्ष्मी) ओमप्रकाश यादव बिनविरोध निवडून आल्या. धरमपेठ झोन क्र.२ च्या सभापतीपदासाठी भाजपच्या धनश्री देशपांडे यांचा बिनविरोध निवडून आल्या. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमाननगर झोन क्र.३च्या सभापतीपदासाठी भाजपच्या ज्योती देवघरे बिनविरोध निवडून आल्या. धंतोली झोन क्र.४ च्या सभापतीपदी भाजपच्या भारती बुंदे यांची अविरोध निवड झाली. नेहरूनगर झोन क्र.५ च्या सभापतीपदी भाजपच्या सीमा ढोमणे यांची अविरोध निवड झाली. गांधीबाग-महाल झोन क्र.६च्या सभापतीपदी भाजपच्या उमा देशमुख यांची अविरोध निवड झाली. सतरंजीपुरा झोन क्र.७ च्या सभापतीपदी भाजपच्या अभिरुची राजगिरे यांची अविरोध निवड झाली. लकडगंज झोन क्र.८च्या सभापतीपदी भाजपच्या महेश्वरी बिसेन यांची अविरोध निवड झाली. या सर्व विजयी उमेदवारांचे पीठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.

काँग्रेसचे उमेदवार 2 ठिकाणी विजयी

आशीनगर झोन क्र.९ च्या सभापतीपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक घेण्यात आली. एमआयएमच्या अलिशा फहिम खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर काँग्रेसतर्फे आसिफ सादिक शेख यांनी अर्ज दाखल केला होता. सभापतीपदासाठी दोन उमेदवारी अर्ज आले असल्याचे निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी स्पष्ट केले. निर्धारित वेळेत एकाही उमेदवाराने उमेदवारी मागे न घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या झोनमधील एकूण १६ नगरसेवक निवडणुकीच्यावेळी सभागृहात उपस्थित होते. पीठासीन अधिकाऱ्यांनी हात उंच करून मतदान करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार पहिल्यांदा एमआयएमच्या आलिशा फहिम खान यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यांच्या बाजूने सात जणांनी मतदान केले. यानंतर काँग्रेसचे आसीफ सादिक शेख यांच्या बाजूने 8 जणांनी मतदान केले. निवडणुकीत बसपाच्या हर्षला जयस्वाल यांनी कॉंग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. भाजपचे नगरसेवक किरण मनपिया तटस्थ राहिले. यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार आसिफ सादिक शेख यांना विजयी घोषित केले. तर मंगळवारी झोन क्र.१० च्या सभापतीपदी काँग्रेसच्या सीमा डवरे अविरोध निवडून आल्या. या दोन्ही विजयी उमेदवारांचे पीठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेवक विवेक निकोसे,भावना लोणारे, कल्पना द्रोणकर व दिनेश यादव उपस्थित होते.

रुपाली ठाकूर अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती 

अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी भाजपतर्फे रुपाली ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच उपसभापती पदासाठी लखन येरावार यांनी अर्ज दाखल केला होता. सभापतीपदी रुपाली ठाकूर तर उपसभापतीपदी लखन येरावार यांच्या नावांची घोषणा पीठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. दोन्ही विजयी उमेदवारांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.

Popular Articles