– मातोश्री 2 आणि अलिबाग बंगल्याच्या खर्चाचा हिशोब संजय राऊतांनी जाहीर करावा
– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा हल्लाबोल
मुंबई :- भाजपाच्या अधिकृत बँक खात्यातून 90 कोटी देऊन एकनाथ रिॲल्टर्ससोबत जमीनीचा व्यवहार झाला आहे. संपूर्ण पारदर्शक पद्धतीने हा व्यवहार झाला आहे. हिंम्मत असेल तर संजय राऊतांनी मातोश्री 2 आणि आपल्या अलिबागमधल्या बंगल्याचा हिशोब जाहीर करावा असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केला. दुसऱ्यांच्या जमीनी लाटून स्वतःसाठी पंचतारांकित फाईव्ह स्टार बंगले आणि घरे आम्ही बांधत नाही तर भाजपा कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उभे करते असेही बन यांनी नमूद केले.
भाजपा कार्यालय जमीनीच्या फाइल्स राफेलच्या वेगाने हलल्या असा आरोप करणाऱ्या राऊतांना चोख प्रत्युत्तर देत श्री. बन म्हणाले की, मातोश्री -2, अलिबाग बंगल्याच्या फाइल्स कशा ब्रह्मोसच्या वेगाने हलल्या हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता भाजपावर खोटेनाटे आरोप करून जनतेला फसवू नका. सर्वसामान्यांच्या जमीनी बळकावून पत्राचाळ घोटाळा करणा-यांनी भाजपाला शिकवू नये. प्रदेश भाजपाच्या नवीन कार्यालय जमीनीचा खरेदी व्यवहार पारदर्शक आहे. अलिबागमधील सर्वसामान्यांचे सातबारे लाटून राऊतांनी बंगला बांधला अशी टीका बन यांनी केली.
मराठी भाषा भवन आणि राऊतांचा दुटप्पीपणा
मराठी भाषा भवनावरून राऊतांवर पलटवार करत बन यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने उर्दू भाषा भवनासाठी जमीन दिल्याची आठवण करून दिली. मरीन लाईन्स येथे मराठी भाषा भवन निश्चितपणे होणार. मराठी भाषेचा सन्मान हा भाजपाचा धर्म आहे, तर खानांची खुशामत हा उबाठा गटाचा धर्म आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली.
12 पक्ष फिरून आलेल्या धंगेकरांची अमित शाह यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. धंगेकरांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही बन यांनी दिला. जैन बोर्डिंग प्रकरणी धंगेकरांनी खोटे आरोप करून पुणेकरांचा अपमान केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना धंगेकर खोटे आरोप करत आहेत. पुणेकर धंगेकरांना निवडणुकीत धडा शिकवतील असे बन म्हणाले.
अदानींच्या संपत्तीमध्ये वाढ होते का नाही या प्रश्नाचे उत्तर संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारायला हवे असा टोला बन यांनी लगावला. पवार-अदानी जवळीक सगळ्यांना ठाऊक आहे तेव्हा राऊतांनी तिकडे धाव घ्यावी.
संविधान वाचवा, लोकशाही जगवा अशी हाकाटी देत खोट्या मतदार यादी विरोधातील विरोधकांच्या मोर्चावर टीका करत बन यांनी या मोर्चाची फॅशन स्ट्रीटवरून निघणारा फॅशन शो अशा शब्दांत खिल्ली उडवली. असा फॅशन शो महाविकास आघाडीने विधानसभेच्या निवडणुकीवेळी देखील केला होता मात्र मतदारांनी शोला फ्लॉप करण्याचे काम केले होते. उद्याचा शो देखील फ्लॉप करण्याचे काम मुंबईकर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांचा अपमान राऊतांचा इतिहास!
फलटणच्या घटनेचे हीन राजकारण करणे थांबवा असे म्हणत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले. हे न्यायप्रिय सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहानिशा करत माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे याप्रकरणी निर्दोष आहेत असे जाहीरपणे सांगितले तरी राऊत जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत. दोषींना कठोर शासन देण्यास भाजपा कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले. फोनवरून महिलांना अर्वाच्च शिवीगाळ करणा-या राऊतांच्या तोंडी महिला सन्मान हे शब्द शोभत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.




