– तहसीलदार, कृषी अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने उत्सवाला विशेष महत्त्व
कामठी :- शेतकरी आणि पशुधन यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक असलेला बैलपोळा सण कामठी तालुक्यातील गादा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभल्याने उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
याप्रसंगी तहसीलदार गणेश जगदाळे, तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, सरपंच सचिन डांगे, पोलीस पाटील चकोले आदी उपस्थित होते.
तालुका प्रशासनातील महसूल, कृषी आणि पोलीस विभागाचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने गादा येथील बैलपोळ्यात ‘तालुका प्रशासनच अवतरल्याचे’ चित्र पाहायला मिळाले. प्रशासन आणि ग्रामीण जनतेतील सुसंवाद निर्देशित करणारा हा उत्सव ठरला.





